एसीबीचे अधिकारी असल्याचे भासवत 10 लाखांसाठी डॉक्टरचे अपहरण
कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत एका डॉक्टरचे 10 लाखांसाठी अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी संबंधित डॉक्टरला दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याची भीती दाखवून डॉक्टरांकडे 10 लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
राजापूर तालुक्यातील कणेरी येथे डॉ. सुभाष आण्णाप्पा डाक (वय-55) यांच्या दवाखान्यात एसबीच्या बनावट अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.3) छापा टाकला. या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जात असल्याची सांगून गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपींनी दहा लाखांची मागणी करुन डॉक्टरांचे अपहरण केले. मात्र, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आरोपींचे बिंग फुटले. पोलिसांनी सुयोग सुरेश कार्वेकर (वय 38, रा. इंद्रायनी नगर, मोरेवाडी, ता. करवीर), रवींद्र आबासो पाटील (वय 42, रा. वाशी, ता. कवीर) आणि सुमित विष्णू घोडके (वय 33, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर) यांना अटक केली असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. डाक हे गेल्या 26 वर्षापासून कणेरी येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यासमोर एक कार येऊन थांबली. कार मधून आलेल्या आरोपींनी आपण एसीबीचे अधिकारी असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यांतील दोघेजण कोल्हापूर तर एकजण दिल्ली एसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी आरोपींनी केली.
दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार आल्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल असे सांगून डॉक्टरांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. गगनबाडा येथे जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आरोपींनी गुन्हा दाखल न करण्यासाठी डॉक्टरांकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. मात्र, डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना कोल्हापूर येथे घेऊन आले. दरम्यान, डॉक्टरांनी पत्नी आणि मामेभाऊ डॉ. सुधीर कांबळे यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी डॉ.डाक यांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये आले.
अपहरणकर्त्यांच्या पाठोपाठ डॉक्टरांचे मामेभाऊ, मेहुणे सुरेश कदम हे पार्किंगमध्ये आले.
त्यांच्यासमवेत अॅड. मीना पाटोळे आणि अॅड. श्रद्धा कुलकर्णी
होत्या. त्यांनी आरोपींकडे असलेले ओळखपत्र तपासले असता तिन्ही संशयित अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया
या खासगी संस्थेचे बनावट अधिकारी असल्याचे लक्षात आले.
दरम्यान, डॉक्टर डाक यांनी 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली होती.
काही वेळात शाहूपुरी पोलीस प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले.
त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी अपहरण करुन खंडणी मागितल्याची कबूली दिली.