आज माझ्याकडे मंत्रीपद नाही, मिशनही नाही, आणि कमिशनही नाही. तरीही लोक येतात..
कोपरगाव : स्वाभिमान आणि रुबाबाने महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा सुरु केली आहेत. कोपरगावात येऊन दैत्यगुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेतले. शुक्राचार्य मेलेल्यांना संजीवनी विद्येद्वारे जीवंत करायचे.
मलाही संजीवनी प्राप्त होईल, अशी आशा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी व्यक्त केली.
दैत्यगुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेण्यासाठी मुंडे कोपरगाव येथे आल्या होत्या. दर्शनानंतर आयोजित छोटेखानी सभेत त्या बोलत होत्या. प्रारंभी शुक्राचार्य मंदिरात दर्शन व आरती केल्यानंतर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिन परदेशी, भागचंद रूईकर, दत्तात्रय सावंत, प्रसाद पऱ्हे, राजेंद्र आव्हाड, राजाराम पावरा, विाकस शर्मा, विलास आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगरसेविका विद्या सोनवणे, चांगदेव कातकडे, प्रसाद कातकडे, डॉ. अजेय गर्जे,, अनिल आव्हाड आदी उपिस्थत होते.
सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, शिव आणि शक्ती जसे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही, तसेच पंकजा मुंडे आणि लोकांना वेगळे करता येणार नाही. शिवशक्ती परिक्रमेचे माध्यमातून लोकांच्या भेटी घेण्यासाठी मी बाहेर पडले आहे. प्रत्येक ठिकाणी भव्य स्वागत केले गेले, यापेक्षा मोठे काय मिळायला हवे, असे सांगून त्या म्हणाल्या महादेव भोळा आहे, त्याला प्रसन्न करून अनेक वर देव-दानवांनी प्राप्त केले. मी फक्त देवाकडे एकच मागणी केली. दिवस असो की रात्र, राज्याच्या कोणत्याही प्रांतात असो, लोकांचे माझ्यावरील प्रेमी कमी होऊ देऊ नको. माझ्याकडे मिशन नाही आणि कमीशनही नाही!
भाजपा आणि युतीला मी 25 आमदार निवडून दिले. पण माझाच पराभव झाला. तिसरा उमेदवार असता, तर माझा पराभव झाला नसता. पराभवानंतर अनेकजण सल्ला देण्यास पुढे आले. आमच्या पक्षात या, अशी गळ अनेकांनी घातली. परंतू मी संयम बाळगला. मी लोकांच्या भरवशावर धाडसाने लढत राहिले. आज माझ्याकडे मंत्रीपद नाही, मिशनही नाही, आणि कमिशनही नाही. तरीही लोक येतात, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास कायम राहील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.