रागाच्या भरात तरुणीने नदीत उडी घेत जीवन संपवले,काय घडलं नेमकं?
रागाच्या भरात तरुणीने नदीत उडी घेत जीवन संपवले. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. सात दिवसांनी मुलीचा मृतदेह नदीच्या किनारी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. क्षुल्लक कारणातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय घडलं नेमकं?
पनवेल तालुक्यातील कासारभाट गावात कुटुंबासोबत राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला मोबाईलचे व्यसन जडले होते. ती मोबाईल जास्त पहायची. तिच्या या सवयीमुळे 23 ऑगस्ट रोजी आई-वडिल तिला ओरडले. यामुळे रागावलेली तरुणी दुपारी घरातून निघून गेली. यानंतर संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. मात्र मुलगी कुठेही सपाडली नाही.
आई-वडिलांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तरुणीचा शोध घेत होते. मात्र तरुणी कुठेही सापडत नव्हती. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या पात्रात तरुणीचा मृतदेह तरंगताना मच्छिमाराने पाहिले. यानंतर पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अंगवारील कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.