हातात कटर सापडला म्हणून कोण चोर ठरत नाही ! गिरगाव न्यायालयाचा निर्वाळा
कुणाच्या हातात कटर किंवा चाव्या सापडल्या म्हणून त्या व्यक्तीला चोर ठरवू शकत नाही. कटर किंवा चाव्या प्रतिबंधित साहित्य नाही. व्यक्तीकडे कटर सापडला म्हणजे तो कटर त्याने चोरीच्या हेतूने जवळ बाळगल्याने गृहीत धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने दोन आरोपींची निर्दोष सुटका केली.या दोघांना चोरटे असल्याच्या संशयावरून ग्रॅण्ट रोड स्टेशनवर अटक केली होती. गिरगाव न्यायालयातील महानगर दंडाधिकारी नदीम पटेल यांनी हा निर्णय दिला. आरोपी सुरेश शर्मा आणि सुनील कनोजिया हे दोघे ग्रॅण्ट रोड स्टेशनवर संशयास्पद फिरत होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. मार्चमध्ये ही कारवाई करण्यात आली. सुरेशकडे कटर, तर सुनीलकडे चार चाव्या सापडल्या होत्या. तथापि, केवळ कटर, चाव्या सापडल्या म्हणून कुणाला चोर ठरवू शकत नाही. सर्वसाधारणपणे वायर कापण्यासाठी इलेक्ट्रिशियनकडे कटर असतो, असे दंडाधिकाऱ्यांनी नमूद केले.