ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हारला
पुणे : माेबाइल फाेनवरून तीन पत्ती खेळात पैसे हारल्यामुळे एका कामगार युवकाने व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफाेडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पाेलिसांनी कामगारास अटक केली असून, त्याच्याकडून २७ लाख ५० हजारांचे साेन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.मनीष जीवनलाल राय (वय २९, रा. सांगवी राेड, मूळ रा. कटणी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्याविराेधात चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी त्र्यंबकराव पाटील (वय ७५, रा. औंध) यांनी फिर्याद दिली हाेती.
फिर्यादी यांचा खत निर्मितीचा व्यवसाय आहे. औंध परिसरात राहावयास आहेत. बंगल्यात घरफाेडी करीत अज्ञात चाेरट्याने ११ लाख रुपयांची राेख रक्कम आणि ५५ ताेळे साेन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजारांचा ऐवज चाेरून नेला हाेता. चतु:शृंगी पाेलिसांच्या पथकाने या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करीत आराेपी मनीष राय याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांत चाेरलेले ५५ ताेळे दागिने हस्तगत केले आहेत.
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पाेलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, रूपेश चाळके, श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, बाबूलाल तांदळे, मारुती केंद्रे, बाबा दांगडे, किशाेर दुशिंग, श्रीधर शिर्के, इरफान माेमीन, आशिष निमसे, सुधीर माने, प्रदीप खरात, सुधीर अहिवळे, विशाल शिर्के, तेजस चाेपडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
चाेरलेली ११ लाखांची रक्कमही हरला
मनीषला माेबाइलवरून तीन पत्ती खेळण्याचा नाद आहे. तपासादरम्यान पाेलिसांनी त्याच्या बँक स्टेटमेंटची तपासणी केली. त्यामध्ये फिर्यादींच्या बंगल्यात मनीष घरकाम करीत हाेता आणि त्यानेच मागील तीन महिन्यांत घरातील ११ लाख रुपयांची रक्कम चाेरी केली आणि तीन पत्ती खेळात रक्कम हारला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.