संजू सॅमसनची चार नंबरवर इम्पॅक्टफुल इनिंग! आशिया कपसाठी निवड होणार?
टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना ३३ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना १८५/५ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ 20 षटकात १५२ धावा करू शकला आणि सामना ३३ धावांनी गमावला.
दरम्यान, त्यापूर्वी या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या २६ चेंडूत ४० धावा फटकावल्या. यासह संजूने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संजूची इम्पॅक्टफूल इनिंग
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा हे झटपट बाद झाले. संघाने ३२ धावांत २ गडी गमावले होते, त्यामुळे भारत अडचणीत सापडला होता. अशा स्थितीत संजूने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. मात्र १० चेंडू खेळल्यानंतर त्याने संघाची धावसंख्या वेगाने वाढवली. संजूच्या अशा खेळीमुळे ऋतुराज गायकवाडला सेट होण्याची संधी मिळाली. नंतर त्याने अर्धशतकही पूर्ण केले, ऋतुराजने ४३ चेंडूत ५८ धावांची सावध खेळी केली.
संजूने जोशुआ लिटलची धुलाई केली
संजूने आपल्या खेळीत जोशुआ लिटलच्या एका षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. डावाच्या ११व्या षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने शानदार चौकार लगावले आणि शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकून जोशुआ लिटलचा समाचार घेतला. या षटकात एकूण १८ धावा आल्या. पण संजू आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. डावाच्या १३व्या षटकात संजू सॅमसनने आपली विकेट गमावली. त्याच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. तो २६ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याला फिरकीपटू बेंजामिन व्हाईटने बोल्ड केले.
चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन उत्तम पर्याय
संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, या क्रमांकावर त्याने शानदार फलंदाजी केली. सध्या टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्डकपसाठी टीम मॅनेजमेंट चौथ्या क्रमांकावर चांगले योगदान देऊ शकेल, अशा फलंदाजाच्या शोधात आहे. संजूच्या या इनिंगनंतर चाहते त्याला चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम दावेदार म्हणत आहेत.