राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासनाचे उद्योग पुरस्कार प्रदान
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदापासून सुरु करण्यात आलेले ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार टाटा समूहाचे पितामह रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी देण्यात आला. आजच्या कार्यक्रमात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देण्यात आले.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना ‘उद्योग मित्र’ पुरस्कार देण्यात आला. महिला उद्योजिकेला देण्यात येणार ‘उद्योगिनी पुरस्कार’ किर्लोस्कर समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना देण्यात आला, तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार देण्यात आला.
आजच्या कार्यक्रमात ‘उद्योग रोजगार मित्र’ याउपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.