पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यास अटक करण्याची मागणी; भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
पुणे – कोरेगाव पार्कमधील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यासह हॉटेलमालकास अटक करण्यात यावी, तसेच या भागातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता.
१६) रात्री आंदोलन करण्यात आले.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा प्रदेशचे सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले.
कोरेगाव पार्क ॲनेक्स येथील हॉटेल फ्रेक-सुपर क्लबसमोर रात्री झालेल्या या आंदोलनात युवा मोर्चा कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष आशिष सुर्वे, शहर सरचिटणीस ओंकार केदारी, राजू परदेशी, प्रदेश पदाधिकारी अनिकेत हरपुडे, रोनक शेट्टी, ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार रायकर, युवा वॉरियर्सचे अध्यक्ष प्रतीक गुजराथी, प्रतीक कुंजीर, प्रणय शिंदे, सुरेंद्र ठाकूर, नीलेश कांबळे, ओमकर धुमाळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात अवैध धंदे, पबमध्ये रात्रभर धिंगाणा सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत असून, शहरातील संस्कृती बिघडत आहे. याबाबत संबंधित पोलिसांना पत्र देऊनही कारवाई केली जात नाही.
पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु अद्याप अटक करण्यात आलेली नाही. जोपर्यंत हॉटेल मालक आणि आरोपी जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आली.