NCPमध्ये घडामोडींना वेग, सुप्रिया सुळेंनंतर अजितदादाही नवाब मलिकांच्या भेटीला
मुंबई, नवाब मलिक यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते त्यांची भेट घेत आहेत. नवाब मलिक जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्याच दिवशी जाऊन त्यांची भेट घेतली.
यानंतर छगन भुजबळ आणि प्रफुल पटेलही मलिकांना भेटले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मलिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार नवाब मलिकांच्या घरी गेले, यावेळी अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफही उपस्थित होते.नवाब मालिक यांना राजकारणात अडचणीत आणायचं नाही. मलिक यांच्यावर झालेले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत.
त्यांना आता दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या सुटकेचा आम्हा सर्वांना आनंद आहे. पण त्यांना सध्या विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय तसदी देणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.मलिकांना अटींवर जामीनवैद्यकीय उपचारांसाठी नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला. फक्त वैद्यकीय कारणास्तवच जामीन दिला जात असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं, तसंच ईडीनेही न्यायालयामध्ये नवाब मलिकांच्या जामिनाला विरोध केला नाही.दरम्यान नवाब मलिक यांना काही अटींवर जामीन देण्यात आला आहे.
जामीन देताना सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांसमोर काही अटी ठेवल्या. मलिक यांना प्रकरणातील साक्षीदार आणि अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवता येणार नाही. मलिक यांच्याशी संपर्क होईल तो फोन नबंर आणि पत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागेल. पासपोर्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट ईडीकडे जमा करावं लागेल. कुठल्याही माध्यमांशी संवाद साधायचा नाही, फक्त हीच केस नाही तर कोणत्याही प्रकरणासंबंधी माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची नाही. वैद्यकीय चाचणीत रुग्णालयातून जी माहिती मिळेल ती पूर्ण माहिती ईडीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना वेळोवेळी द्यावी लागणार आहे.