तो शो ठरला शेवटचा! ‘गदर’ पाहून बाहेर आला, तितक्यात ८-१० जण आले अन्.; पुण्यात थरारक घटना
पुण्यातून खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून दहा ते बारा जणाच्या टोळक्याने तलवार, कोयत्याने सपासप वार करुन एका तरुणाचा निर्घुण खून केला. मंगला चित्रपटगृहाजवळ बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, ताडीवाला परिसरात टोळीच्या वर्चस्वावरुन दोन टोळ्यांमध्ये वारंवार भांडणे होत होती. फिर्यादी व नितीन म्हस्के हे गदर २ चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात आले होते. हे यल्ल्याच्या टोळीला समजले.
ते चित्रपट सुटण्याची वाट पहात आऊट गेटवर थांबले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चित्रपट सुटल्यानंतर नितीन म्हस्के हा बाहेर आल्यावर लोकांच्या गर्दीत त्यांनी नितीनला घेरले. त्याच्यावर डोक्यात, मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, फरशीच्या तुकड्यांनी वार केले.
यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल सुहेल शर्मा हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये या आरोपींसोबत कुठल्यातरी कारणावरून भांडणे झाली होती. यावेळी म्हस्के याने आरोपीपैकी एकावर हल्ला केला होता. तो राग त्याच्या मनात होता.
याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हास्केचा खून करायचे ठरवले. दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वरवर जाताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे.