मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण…”; एकनाथ शिंदेंचा निशाणा कुणावर?
राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सत्तेत आहेत. मात्र या तीन पक्षात समन्वय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत.
आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी देखील चर्चा देखील रंगली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला होता. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धा होती, यासाठी पद्मविभूषण बुद्धिबळपट्टू विश्वनाथ आनंद आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. “गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही”, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, काही विरोधक तिरकी चाल चालतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. मात्र जनता आपल्यासोबत असल्याने विरोधक नेहमी चितपट होतात. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या नेत्यांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे.
गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर बोललात. ठाण्यात समाजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे आहेत, असे शिंदे म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे दोन महिने रुग्णालयात दाखल होऊ शकतात आणि वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री आणले जाऊ शकतात.”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या महिन्यात दावा केला होता की, “शिवसेना-भाजप सरकारमधील अजित पवार यांची १० ऑगस्टच्या सुमारास मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होऊ शकते”. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला होता.