अब्दुल कलाम यांनी कंपनीला परत केले होते भेटवस्तूचे पैसे अधिकाऱ्याची ‘ती’ पोस्ट तुम्हालाही वाटेल अभिमान • वाचून
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील सर्वात प्रशंसनीय लोकांपैकी एक आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं होतं. तर अनेकांसाठी ते एक आदर्श होते.
राष्ट्राने आठव्या जयंतीनिमित्त शिक्षक आणि एरोस्पेस शास्त्रज्ञ असणाऱ्या कलाम यांना आदरांजली वाहिली. एमव्ही राव यांनी आठवड्याच्या सुरुवातीला एक असे उदाहरण सांगितले आहे, ज्यामध्ये कलाम त्यांच्या रोजच्या जीवनात नैतिकतेने कसे जगले हे सांगितलं आहे. त्यांनी दिवंगत राष्ट्रपतींच्या भेटवस्तू न स्वीकारण्याच्या तत्त्वांना उजाळा दिला आहे.
भारताच्या मिसाईल मॅनने त्यांना दिलेला ग्राइंडर स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याचे पैसे देण्याचा आग्रह धरल्याचं राव यांनी सांगितलं आहे. श्री राव यांनी ट्विटरवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “२०१४ मध्ये, ‘सौभाग्य वेट ग्राइंडर्स’ नावाची कंपनी एका कार्यक्रमात प्रायोजक होती जिथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. डॉ. कलाम यांनी फर्मकडून दिली जाणारी ग्राइंडरची भेट स्वीकारण्यास आदरपूर्वक नकार दिला. मात्र, प्रायोजकाच्या सांगण्यावरून त्यांनी ही भेट स्वीकारली. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी त्यांनी कंपनीला ग्राइंडरच्या बाजारभावाचा धनादेश पाठवला. मात्र, कंपनीने चेक जमा न करण्याचा निर्णय घेतला.”
आपल्या खात्यातून पैसे काढले गेले नाहीत हे समजताच, कलाम यांनी कंपनीला तो धनादेश जमा करण्याची सूचना दिली. तसेच पैसे स्विकारले नाहीत तर त्यांना ग्राइंडर परत पाठवला जाईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कंपनीने धनादेशाची एक फ्रेम केली आणि त्यांनी तो चेक जमा करुन घेतला.
राव यांनी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत २ लाख 248 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकजण या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक नेकऱ्यांनी कलाम एक महान व्यक्तिमत्व असल्याचंही कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “साधी राहणी उच्च विचारसरणी” अशी प्रतिक्रिया दिली आहे.