नागराज मंजुळेंनीच केला दत्तकपुत्र असल्याचा खुलासा
मुंबई : प्रत्येक चित्रपटात आपल्या दमदार दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकणारे नागराज मंजुळे यांचा ‘बापल्योक’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. एकाहून एक दर्जेदार चित्रपट मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत देणाऱ्या अण्णा अर्थात नागराज मंजुळेंच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसे कुणाला माहित नाही.
सध्या ‘बापल्योक’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झालेल्या मुलाखतीत मंजुळेंनी ते दत्तकपुत्र असल्याचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले नागराज मंजुळे?
“माझ्या मोठ्या चुलत्याने मला दत्तक घेतलं होतं. त्यांचं नाव आहे बाबुराव. त्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला मला दत्तक दिलं होतं. तेव्हापासून मी माझं नाव नागराज बाबुराव मंजुळे असंच लिहायचो. पण, एकदा एका नियतकालिकाला मी माझी कविता पाठवली. या कवितेच्या खाली मी फक्त नागराज मंजुळे असं लिहिलं होतं. त्यावेळी त्यांना (पोपटराव मंजुळे यांना) हे आवडलं नाही. माझा मोठा भाऊ, जे तुझे वडील आहेत, त्याचं नाव तू लिहिलं पाहिजे. बाबुराव हे नाव काढू नकोस”, असं त्यांनी मला बजावलं.
- पुढे ते म्हणाले, “त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटलं की हे त्यांच्या मोठ्या भावाचं नाव मला लावायला सांगत आहेत. ज्यांच्याकडे मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव टिकवावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं वाटलं. पण, तेव्हापासून मी माझ्या कवितेला नागराज बाबुराव मंजुळे असं नाव लिहायला लागलो. परंतु, माझ्या आयुष्यात दुसरं काही केलं तर नागराज पोपटराव मंजुळे हेच नाव लावणार असं माझं आधीपासूनच ठरलं होतं. आणि, अपघाताने मी सिनेसृष्टीत आलो. तेव्हापासून माझ्या पहिल्या सिनेमापासून मी सगळीकडे नागराज पोपटराव मंजुळे असंच नाव लिहितो,” असा किस्सा मंजुळेंनी सांगितला. दरम्यान, नागराज मंजुळे यांचा ‘बापल्योक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातून बाप आणि लेकाची उत्तम कहाणी उलगडली जाणार आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.