नाराज गटाला मुख्यमंत्र्यांनी आज चर्चेला बोलाविले; पदाधिकारी राजीनाम्याच्या प्रतीक्षेत
मुंबई : महिलांविषयी अपशब्द वापरणारा आणि मनमानी करणारा विभागप्रमुख आम्हाला नको, या मागणीसाठी विभाग क्रमांक ४ मधील जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात शिंदे गटात असंतोष उफाळून आला होता.
त्यामुळे शिंदे गटाचे ४०० महिला व पुरुष पदाधिकारी महिलांविषयी अपशब्द वापरणारा विभागप्रमुख बदला आणि आमची काढून घेतलेली पदे आम्हाला परत द्या, या मागणीसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. यासंदर्भात सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘विभागप्रमुख एवढे छळू लागले की, आत्महत्या करावी असे वाटते’ असे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून उद्या दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलाविले आहे.
सोमवारी दुपारी साडेचार वाजता शिंदे गटाचे सचिव, प्रवक्ते व माजी आ. किरण पावसकर यांनी बैठकीसाठी बाळासाहेब भवन येथे बोलाविले होते. या बैठकीत शाखाप्रमुख प्रकाश शिंदे, संतोष कवठणकर, निशा काकडे, अपूर्वा आंबेरकर, शाखा समन्वय प्रांजल, उपशाखाप्रमुख नीतेश गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे दीडतास आमची बाजू आम्ही त्यांना सांगितली. महिलांविषयी अपशब्द वापरणारा आणि मनमानी कारभार करणारा विभागप्रमुख बदला आणि आमची काढून घेतलेली पदे आम्हाला परत द्या, अशी आग्रही मागणी आम्ही पावसकर यांच्याकडे केली.
पावसकर यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या चर्चेसाठी दुपारी ३ वाजता वर्षावर वेळ दिली आहे आणि मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती शाखाप्रमुख प्रकाश शिंदे यांनी ‘ दिली.