“येत्या दोन दिवसात.”, मुख्यमंत्री बदलाबाबत आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं विधान
- छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच फडणवीस म्हणाले, या महाआरोग्य शिबिरात मानसोपचार तज्ज्ञदेखील उपस्थित आहेत. या शिबिरात राज्यातील काही वाचाळवीर राजकीय नेत्यांना बोलावून त्याच्यावरही तज्ज्ञांकडून मानसोपचार करावेत. तसेच गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावं. ही टीका करत असताना फडणवीस यांचा रोख शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे होता.
दरम्यान, फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “आता काय झालंय की तिकडे (महायुतीत) संभ्रमाची परिस्थिती आहे. खरा मुख्यमंत्री कोण? याबद्दल तिकडे संभ्रम आहे. परंतु, ही गोष्ट येत्या दोन तीन दिवसात आपल्याला समजेल.” राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील असे दावे वेगवेगळ्या नेत्यांकडून होत आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अभियंत्यांकडून आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेला हा प्रकल्प उत्तमरित्या पूर्णत्वास जात आहे. यावेळी मी बीडीडी येथील रहिवाशांबरोबर प्रकल्पाविषयी चर्चा केली.
खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा प्रश्न
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील खरा मुख्यमंत्री कोण आहे? असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेतही विचारला होता. मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून सरकारला खडे बोल सुनावत असताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील दोन आठवड्यांपासून मी सतत मुंबई-नाशिक महामार्गाचा विषय लावून धरला आहे. राज्यातले अनेक मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत. मुंबई-नाशिक रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळेच हे मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत.”