राज ठाकरेंच्या विधानाने भाजप मनसेच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. ”भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत असल्याने आपण अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याचे राज यांनी सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटले आहे,” अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सोमवार, रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी वरील विधान केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ”आपल्याला युतीबाबत ऑफर असली तरी अद्याप मी कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारही असून युतीचे संभाव्य गणित काय असेल याची स्पष्टता नाही. त्यामुळे आपण युतीबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे विधान राज यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली
अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरही राज यांनी कटाक्ष टाकला आहे. ”मी यापूर्वीही सांगितले होते की हे एकच आहेत. अजित पवार आज सत्तेत आहे त्याच कारण शरद पवार आहेत. पवारांमुळेच दादा आज सरकारमध्ये आहेत. त्यांनी आधी एक टीम पुढे पाठवली आता काही दिवसांनी दुसरी टीमही पुढे जाईल,” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.