अजितदादांचं ‘तो मी नव्हेच’, शरद पवारांसोबतच्या भेटीवर पहिल्यांदाच बोलले
कोल्हापूर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे दौऱ्यादरम्यान शरद पवारांची भेट घेतल्यानं गदारोळ माजला होता. यावर आता अजित पवारांनी मौन सोडलंय. शरद पवारांची आपण पुणे दौऱ्यात भेट घेतल्याचं अजित पवारांनी कबूल केलंय.
पुतण्यानं काकांची भेट घेण्यात गैर ते काय असा सवाल त्यांनी केला. तर लपून छपून शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं मात्र त्यांनी खंडन केलं. आपण त्या गाडीत नव्हतोच असं अजित पवारांनी ठासून सांगितलं.’मी लपून गेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला लपून जायचं काय कारण आहे?
तुम्ही मला लपून गेलेलं कुठे बघितलं? मी उद्या तुमच्या घरी आलो तर कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. मी त्या गाडीमध्ये नव्हतोच तर मी उतरणार कसा? मी बैठकीला गेलो हे मी मान्य करतो, पण ज्या गाडीचा अपघात झाला, ती गाडी माझी नव्हती आणि मी त्या गाडीत नव्हतो,’ असं अजितदादांनी दरडावून सांगितलं.’पुण्याच्या बैठकीचं मनावर घ्यायचं कारण नाही.
पवार साहेबांनी स्वत: सांगितलं. पवार घराण्यातील ते ज्येष्ठ आहेत. नात्याने मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तींना भेटणं हे कारण नसताना मीडिया त्याला इतक्या वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देतात, त्यातून समज गैरसमज निर्माण होतात,’ असं अजित पवार म्हणाले.’चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत.
चोरडिया साहेबांचे वडील पवार साहेबांचे क्लासमेट होते. पवार साहेब व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर माझे पुढचे कार्यक्रम होते. त्यावेळी चोरडिया साहेबांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं होतं. जयंत पाटीलही पवार साहेबांसोबत होते कारण तेही व्हीएसआयच्या कमिटीमध्ये सदस्य आहेत. मीपण व्हीएसआयला आहे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.