जी-20 मुळे जागतिक धोरणात भारताचा दबदबा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली: जी-20 च्या यजमानपदाचा मान भारताला मिळाल्यामुळे व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील धोरणामध्ये भारत जगात ठसा उमटवेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस देशवासीयांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे जगातील आर्थिक धोरणासारख्या निर्णयप्रक्रियेत भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. जगाच्या लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या दोन तृतीयांश आहे. त्यामुळे भारत नजीकच्या काळात जगाला सकारात्मक दिशा देऊ शकेल. आज जगाच्या व्यासपीठावर भारताने स्थान पटकावले असून आंतरराष्ट्रीय प्रश्नावरही भारत आग्रही भूमिका घेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. देशाने आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित केले आहे आणि जीडीपीमध्ये प्रभावी वाढ नोंदवली आहे. भारताची अर्थव्यवस्था केवळ कठीण काळातच सक्षम नाही तर इतरांसाठीही आशेचा स्रोत बनली आहे.