ताज्या बातम्या

पावसाच्या विषमतेचा परिणाम; जिल्ह्यात हंगामात ९३ टक्केच पेरणी पूर्ण


सातारा : जिल्ह्यात पावसाची विषमता राहिल्याने यावर्षी खरीप हंगामात ९३ टक्क्यांवरच पेरणी पूर्ण झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर यंदाही सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झालेली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर होते. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आलेले. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आता खरीपची पेरणी संपली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार २ लाख ६९ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाणत ९३.३८ इतके आहे. यामध्ये भाताची लागण ४३ हजार १८१ हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार ६७१ हेक्टरवर तर मकेची १६ हजार ८६१ हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ८५ हजार ७९२ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ११५ आहे. तर भुईमुगाची २७ हजार ३३२ हेक्टर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. पण, हा पाऊस पश्चिमेलाच चांगला झाला. तर पूर्व माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही आजही पावसाची प्रतीक्षा आहे. पण, पाऊस पडेल आशेवर दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण, पेरणी क्षेत्र कमी राहिले. सध्या पावसाअभावी ही पिके वाळू लागलीत. तर पश्चिम भागात पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या. त्यामुळे ही पिके चांगलीही आली आहेत. पण, यावर्षी पावसाची विषमता राहिल्याने खरीप हंगामातील पेरणी १०० टक्के झालीच नाही. त्यामुळे १९ हजार हेक्टरवर क्षेत्रावरील पेरणी राहिल्याचा अंदाज आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button