इंडिया’च्या धास्तीने भाजपने राष्ट्रवादी फोडली; रोहित पवार यांचा आरोप
लातूर देशात भाजपाविरोधात सक्रिय झालेला ‘इंडिया’ हा आपल्या मार्गातील प्रमुख अडसर असल्याची धास्ती घेत ‘इंडिया’त घटकपक्ष असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने फोडला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (दि.१४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. १७ ऑगस्ट रोजी बीड येथे त्यांची सभा होत आहे. त्या सभा नियोजनासाठी आमदार रोहित पवार सोमवारी लातूर येथे आले होते. त्तपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात आज बीजेपी विरोधात लोक जात आहेत. २०१९ ला एनडीएच्या बैठका होत नव्हत्या. आता वातावरण विरोधात जात असल्याचे पाहून एनडीएच्या मित्र पक्षांना विचारात घेतले जात आहे. तीनशे खासदारांचा आकडा पार झाला असतानाही भाजपला पक्ष फोडावे लागत आहेत, कुटुंब फोडावे लागत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे १०५ पेक्षा अधिक आमदार असताना व शिंदे गट सोबत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्याचे कारण काय? असा प्रश्न आ.पवार यांनी यावेळी केला व त्याचे अप्रत्यक्ष उत्तरही सांगून टाकले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार प्रदेश सचिव नागराळकर, संजय शेटे, आशाताई भिसे, शेखर हविले आदी उपस्थित होते.
आपल्याला लढायचंय, लोकांमध्ये जायचंय, विश्वास गमवायचा नाही. विचार तुडवायाचा नाही. तो टिकवायचा अन वाढवायचा आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपायचा आहे अन प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे, हा शरद पवारांचा संदेश घेऊन आज लातूर जिल्ह्यात आलो असल्याचे आ. रोहित पवार म्हणाले. हे करीत असताना विरोध होईल, दबाव आणला जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, महाराष्ट्रातील सह्याद्री कधी दिल्ली दरबारी झुकलेला नाही अन झुकणारही नाही, हा शरद पवारांचा संदेश सांगण्यासाठी मी आलो आहे, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.