चिंचवड – राष्ट्रप्रेमाचा नारा देत तिरंगा बाईक रॅलीला उस्त्फूर्त प्रतिसाद
भारत माता की जय… वंदे मातरमच्या घोषणा… दुचाकी वाहनांना डौलाने फडकणारा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि रस्त्यावरून शिस्तबद्ध जाणारी दुचाकीची रांग… राष्ट्रप्रेमाने भारावलेले हे चित्र आहे भाजपाच्या वतीने काढलेल्या ‘तिरंगा बाईक रॅली’मधील.
या रॅलीला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचा समारोप आणि ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने चिंचवड किवळे मंडल आणि प्राधिकरण चिंचवड मंडलाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली आयोजित केली होती.
यावेळी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या देशाप्रती आपला अभिमान व्यक्त केला. तसेच, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्याग केला त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाचा होम करुन पेटवलेल्या धगधगत्या क्रांतीपर्वातून साकारलेल्या या स्वातंत्र्यपर्वाचा आपण आदर केला पाहिजे. देशाच्या विकासात आपणही योगदान दिले पाहिजे. या उद्देशाने या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
.या मार्गावर निघाली रॅली
सकाळी 9 वाजता श्रीधर नगर ऑफिस- गार्डन सर्कल – स्वामी विवेकानंद चौक – जीवन नगर अहिंसा चौक – S.K.F. कॉलनी – उद्योग नगर दत्त मंदिर मार्गे – मंगल उपवन- गणेश नगर – श्रद्धा गार्डन भोईर कॉलोनी – दिवाकर चौक- राम मंदिर मार्गे – पारिजात – स्वामी विवेकानंद रोड मार्गे – लाईफ स्टाईल सोसायटी – मोरया हॉस्पिटल – स्वातंत्र्यवीर चापेकरबंधू चौक मार्गावर पार पडली. तसेच, सकाळी 10 वाजता बापुजीबुवा मंदिर थेरगाव, डांगे चौक, सम्राट चौक वाकड रोड, वेणुनगर, पिंक सिटी रोड, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, मानकर चौक, कस्पटे चौक, डीपी रोड विशालनगर, पिंपळे निलख बस स्टॉप या मार्गावर आयोजित करण्यात आली.