काँग्रेसचं प्रगती पुस्तक; कोणत्या सर्वेक्षणात किती जागा मिळण्याची शक्यता ? जाणून घ्या सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विविध वाहिन्यांनी अनेक सर्वेक्षणं केली आहेत.
ज्यामध्ये यावर्षी जानेवारीमध्ये इंडिया टुडे, जूनमध्ये टाईम्स नाऊ आणि गेल्या महिन्यात इंडिया टीव्हीनं विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या स्थापनेनंतर लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं. ज्याच्या सर्वेक्षणातून समोर आलेला जनतेचा कौल धक्कादायक आहे.
या तिन्ही सर्वेक्षणांची आकडेवारी पाहिली तर त्यात एक गोष्ट समान आहे. पुढील वर्षी देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचं प्रत्येक सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. तिन्ही सर्वेक्षणांमध्ये एनडीएला 300 जागा मिळतील, तर काँग्रेसला 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत लोकसभेच्या जागा काही प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्या सर्वेक्षणात कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय? जाणून घेऊयात सविस्तर…
जानेवारी 2023 मध्ये करण्यात आलेलं इंडिया टुडेचं सर्वेक्षण
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात एनडीएला एकूण 298 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर सर्वेक्षणात काँग्रेसच्या UPA आघाडीला (त्यावेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीची घोषणा झालेली नव्हती) 153 जागा मिळाल्या. तसेच, इतर पक्षांनी 92 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एकट्या भाजपला 284 जागा मिळाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं होतं.
जून 2023 मध्ये टाइम्स नाऊनं केलेलं सर्वेक्षण
टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार, लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी भाजपच्या एनडीए आघाडीला 285 ते 325 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसच्या यूपीए आघाडीला 111 ते 149 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 38.08 टक्के मतं मिळतील, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 28.82 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना सर्वेक्षणात 33.10 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही सीएनएक्स सर्वेक्षण डेटा
गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अनेक राज्यांमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात जोरदार लढत आहे. मात्र, असं असतानाही एनडीए आघाडीला बंपर 318 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला 175 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात इतरांना 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपला 290 तर काँग्रेसला 66 जागा मिळण्याची शक्यता आहे.
2024 पूर्वी दिल्लीची लढाई केंद्रानं जिंकली, राष्ट्रपतींची सेवा विधेयकाला मंजुरी; आप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार