साडेपाच महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले 92 बळी, सर्वाधिक अपघात मध्यरात्री ते पहाटे 3 या वेळेत
महाराष्ट्राचा गेमचेंजर म्हणून ओळखल्या जाणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने मागील साडेपाच महिन्यांत तब्बल 92 जणांचे बळी घेतले आहेत.
सरळसोट रस्त्यामुळे मध्यरात्री 12 ते पहाटे 3 या काळात चालकाला लागलेल्या डुलकीमुळे तब्बल 41 प्रवाशांना हकनाक प्राण गमवावे लागले, तर अतिवेगाने 29 जण बळी पडल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
मुंबई-नागपूर अंतर आठ तासांवर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार करणारा समृद्धी महामार्ग 11 डिसेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी खुला झाला, पण त्यानंतर या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही या अपघातांचे पडसाद उमटले. या महामार्गावर पुरेशा सोयीसुविधा नसतानाही निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घातला असा आरोप विरोधी सदस्यांनी केला.
या सर्व पार्श्वभूमीवर या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र पाठवले आहे. त्यातील काही उपाय सुचवले आहेत. त्याशिवाय अपघातांची कारणे आणि कोणत्या वेळेत सर्वाधिक अपघात होतात याचाही सविस्तर अहवाल महामार्ग पोलिसांनी रस्ते विकास महामंडळाला सादर केला आहे.
– उन्हाळय़ाच्या दिवसांत टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते.
– महामार्गावरील पेट्रोल पंपांवर टायरमध्ये नायट्रोजन भरण्याची सुविधा आवश्यक.
– प्रत्येक 10 कि.मी. अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे.
– प्रत्येक 50 ते 100 किमी अंतरावर पेट्रोल पंप किंवा विश्रांतीचे ठिकाण तसेच पंक्चर दुकाने, स्वच्छतागृह, हॉटेल आवश्यक.
– महामार्गावर संरक्षक भिंती तोडून केलेले अनधिकृत रस्ते.
– जनावरे येण्यामुळे होणाऱया अपघातांना आमंत्रण.
– चालकाला मध्यरात्री डुलकी लागते. त्यामुळे प्रत्येक 10 ते 20 कि.मी. अंतरावर रम्बलरची गरज.
– महामार्गाच्या दोन्ही बाजूने काही ठिकाणी सुरक्षा भिंत काही ठिकाणी शेतकऱयांसाठी खुली आहे. त्यामुळे या खुल्या जागेतून जनावरे महामार्गावर येतात. त्यांना परत जाण्याचा मार्ग मिळत नाही.
अपघात कारण संख्या मृत्यू
टायर फुटणे 4 10
चालकाला डुलकी व थकवा 10 41
ओव्हरस्पीडिंग 18 12
जनावरे आल्यामुळे 1 1
पार्पिंग किंवा
ब्रेकडाऊन गाडय़ा 2 2
इतर कारणे 6 9
अपघातांची वेळ संख्या मृत्यू
मध्यरात्री 12 ते पहाटे 3 10 39
पहाटे 3 ते पहाटे 6 6 10
पहाटे 6 ते दुपारी 12 13 21
दुपारी 12 ते संध्याकाळी 6 7 12
रात्री 9 ते मध्यरात्री 12 5 10