अति आत्मविश्वास नडला! जैस्वाल आज अ ‘यशस्वी’, ४ चेंडू खेळून परतला तंबूत
(अमेरिका) ट्वेंटी-२० सामन्यात मोठी खेळी केल्यानंतर यशस्वी जैस्वालचा साहजिकच आत्मविश्वास वाढला. पण, आज अखेरच्या सामन्यात भारतीय सलामीवीराला अति आत्मविश्वास नडल्याचे दिसले.
पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करण्याच्या इराद्यात असलेल्या यशस्वीला केवळ ५ धावांवर तंबूत परतावे लागले. अकिल होसैनने आपल्या पहिल्या षटकात संघाला एक बळी मिळवून दिला. लक्षणीय बाब म्हणजे अकिल होसैनने आपल्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला दुसरा झटका दिला. गिल ९ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला.
जैस्वाल आज अ’यशस्वी’
दरम्यान, पहिल्याच चेंडूवर फ्लॉप ठरलेला जैस्वाल दुसऱ्या चेंडूवर चौकार मारण्यात यशस्वी ठरला. पण पाचव्या चेंडूवर समोर मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैस्वालने गोलंदाज होसैनच्या हातात सोपा झेल दिला. यशस्वी चार चेंडूत पाच धावा करून तंबूत परतला. तत्पुर्वी, निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने भारतीय गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. शनिवारी इतर गोलंदाज अयशस्वी होत असताना अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली. याबद्दल बोलताना हार्दिकने म्हटले, “होय, नक्कीच अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली. त्याने चौथ्या सामन्यात तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय इतर गोलंदाजांनी देखील चांगले आव्हान दिले.”
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ –
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ –
रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.