दिवसभर धावणार मुंबईमध्ये अन् मुक्कामाला जाणार ठाण्यात; दोन ठिकाणी उभारणार डेपो
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी जमिनींचा ताबा मिळवत मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, आता मेट्रो मार्ग – १२ साठी निळजेपाडा येथे, तर मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी डोंगरी येथे मेट्रो डेपो उभारण्यात येणार आहेत.
मुंबई मेट्रो मार्ग – १२ च्या डेपोसाठी ठाणे जिल्ह्यातील निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जमीन सरकारने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील निळजेपाडामधील जमीन विनामूल्य असून, भोगवटादार म्हणून एमएमआरडीएला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहेत. मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी दिला आहे. या दोन्ही जागांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन महत्त्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठीचे डेपो आता उभारण्यात येणार आहेत.
मेट्रो मार्ग १२ च्या विस्ताराबाबत अभ्यास सुरु
सरकारच्या मदतीने उर्वरित प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो डेपोसाठीच्या जागा हस्तांतरित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मेट्रो मार्ग १२ च्या विस्ताराबाबत आम्ही अभ्यास करत असून, तिचे नवी मुंबई मेट्रोच्या मेट्रो स्थानकासोबत एकत्रीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
– डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मुंबई मेट्रो मार्ग २ ब, ४, ४ अ, ५, ६, ७ अ आणि ९ यांची कामे प्रगतिपथावर असून, ती लवकरच पूर्ण होतील.
मेट्रो मार्ग १० साठी विविध पर्यावरण विषयक परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जात आहे.
मेट्रो मार्ग १४ (कांजूरमार्ग ते बदलापूर) साठी सल्लागाराने मसुदा अंतिम अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला आहे.
मेट्रो मार्ग १२ च्या संरेखनचा विस्तार करून ती नवी मुंबई मेट्रो सोबत जोडण्यासाठीचा अभ्यास सुरू आहे.
मेट्रो मार्ग १२ कल्याण तळोजा ही मार्गिका, मेट्रो मार्ग ५ ठाणे – भिवंडी – कल्याण या मर्गिकेसोबत जोडली जाणार आहे.