काँग्रेसची स्थापना, पक्षाचा झेंडा आणि गांधी आडनाव, तिन्ही चोरलेल्या गोष्टी म्हणत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नव्याने उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला केला. यावेळी मोदींनी काँग्रेसचा इतिहास मांडत काँग्रेसवर गंभीर आरोप केले.
काँग्रेसचा झेंडा, गांधी आडनाव आणि निवडणूक चिन्ह कुठून ना कुठून चोरलेलं आहे, असा दावा मोदींनी केला.
मोदी म्हणाले की, १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसचे संस्थापक एक परदेशी व्यक्ती होते. काँग्रेसने जेव्हा देशाच्या राष्ट्रध्वजाबाबत लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास पाहिला तेव्हा त्यांनी १९२० मध्ये देशाचा झेंडा चोरून आपल्या पक्षाचा ध्वज बनवला. एवढंच नाही तर मतदारांना भुलवण्यासाठी यांनी गांधी आडनावही चोरलं. यांचं निवडणूक चिन्ह दोन बैलांची जोडी, गाय-वासरू आणि नंतर हाताचा पंजा हे कुठून ना कुठून चोरलेले आहेत, असा आरोप मोदींनी केला.
दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांकडून आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आपल्यासाठी शुभ असल्याचा दावा केला. तसेच आता २०२८ मध्येही अविश्वास प्रस्ताव घेऊन या. मात्र त्यावेळी थोडी तयारी करून या, आसा खोचक सल्लाही दिला. अविश्वास प्रस्तावावरून विरोधी पक्षांना सुनावताना नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक कुठलेही मुद्दे शोधू शकत नाही आहेत. त्यांच्याकडे कुठलंही नाविन्य नाही आहे. तसेच त्यात कुठलीही कल्पकताही नाही आहे. आता २०२८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा. मात्र पुढच्या वेळी थोडी तयारी करून या, असे मोदी म्हणाले.