दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं
राजधानी दिल्लीतील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपलं नातं मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने थेट आपल्या वहिनीचाच जीव घेण्याचा प्रयत्न केला. संतापाच्या भरात त्याने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं.
पहिल्या माळ्यावरुन खाली पडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीराचं नाव पंकज आहे. पंकज याच्या घरात त्याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. गुरुवारी त्याच्या घऱात मुलीचे कुटुंबीय आले होते. यादरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना पंकज आणि घर आवडलं असल्याने ते नातं निश्चित करण्याच्या तयारीत होते. पण सर्व काही सुरळीत सुरु असतानाच पंकजची वहिनी खुशबूने घरी आलेल्या पाहुण्यांसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पंकजच्या वहिनीने घातलेला गोंधळ पाहून, मुलीकडचे पाहुणे आश्चर्याने पाहत राहिले. यानंतर त्यांना तात्काळ आपला निर्णय बदलला आणि आपली मुलगी पंकजला देण्यास नकार देत चर्चेचा पूर्णविराम दिला. मुलीचे कुटुंबीय नकार देत तात्काळ घरातून निघून गेले होते.
आपलं लग्न ठरता ठरता मोडल्याने पंकज मात्र नाराज झाला. वहिनीमुळेच आपलं नातं तुटलं असा आरोप पंकज करु लागला. यावरुन दिवसभर घऱात मोठा वाद रंगला होता. दिवसभर त्यांच्या घऱात भांडण सुरु होतं. यानंतर संतापलेल्या पंकजने वहिनी खुशबूला उचललं आणि पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने शुशबू गंभीर जखमी झाली होती. तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी दीपकविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या पीडिता खुशबूचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आरोपी पंकजची कसून चौकशी केली जात आहे.