‘नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी’ – एकनाथ शिंदे
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी #श्रद्धांजली वाहिली आहे.
चित्रपट, कला क्षेत्रामध्ये नितीन देसाई यांनी…— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2023
त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे.
नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या ‘भूकंप’ सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आज 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हा कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे. चित्रपट, कला क्षेत्रामध्ये नितीन देसाई यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन देसाई यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबिंयांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना करुन देसाई यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य ‘एनडी स्टुडिओ’ त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके नम’ अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर ‘बालगंधर्व’ सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. ‘देवदास’,’खामोशी’ या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.