चिनी रॉकेट फोर्सच्या प्रमुखांची चौकशी
बीजिंग: चिनी सेनादलांतील रॉकेट फोर्सच्या तीन अत्युच्च अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि हेरगिरीचे आरोप ठेवले आहेत.
या दलाकडे देशाची अण्वस्त्रे आणि पारंपरिक क्षेपणास्त्रांची जबाबदारी सोपवली होती. या दलाचे विद्यमान प्रमुख ली युचाओ, उपप्रमुख लिऊ ग्वांगबिन आणि माजी अधिकारी झांग झेनझाँग या तिघांना सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे स्वत: सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रमुख आहेत. रॉकेट फोर्सचे माजी प्रमुख वेई फेंघे मार्च महिन्यात संरक्षण मंत्री पदावरून निवृत्त झाले.
तेव्हापासून या तपासाला सुरुवात झाली होती. रॉकेट फोर्समधील अधिकाऱ्यांनी हार्डवेअर खरेदीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आणि शत्रूदेशांना गुपिते पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रॉकेट फोर्सचे माजी उपाध्यक्ष वू गुओहुवा यांचा ४ जुलै रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. याशिवाय चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब असल्याने या स्रव प्रकरणातील संशयाचे धुके वाढत आहे.