अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?
अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, एकनाथ शिंदेच कायम राहतील असे महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर या विषयाभोवती गेली काही दिवस घोंगावत असलेले वादळ शांत झाले.अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असे मात्र नाही; पण ती वेळ यायची आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर त्यांचा नंबर असेल. महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचे भविष्यातील हे तिघेच दावेदार आहेत, तिघांमध्येही त्यासाठीची अपार क्षमता आहे, पण संधी तर एकालाच मिळेल. कुण्या एकाला ती मिळायची असेल तर एकाला केंद्रात जावे लागेल आणि दुसऱ्याला उपमुख्यमंत्री व्हावे लागेल किंवा अन्य दोघांनाही उपमुख्यमंत्री व्हावे लागेल.
आज अत्यंत अवघड आणि जटिल वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे भविष्यात अगदी सहजपणे बरेचदा सापडतात; तसे कदाचित याबाबतही होऊ शकेल. देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला, नंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनाही स्वीकारले. फडणवीस यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाची सव्याज परतफेड एक दिवस भाजपश्रेष्ठी नक्की करतील. श्रेष्ठींनी त्यांचे खच्चीकरण केले असे मानणाऱ्यांनाही परस्पर उत्तर मिळेल.
अजित पवार यांनी वित्त खाते मिळवून आणि आपल्या सहकाऱ्यांना महत्त्वाची खाती मिळवून देत दिल्लीत त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडे वजन असल्याचे दाखवून दिले आहेच, पण ते तूर्त मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत याची काही ठोस कारणे आहेत. एकतर एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठी व फडणवीसांवर विश्वास ठेवून सोबत आले. आता त्यांना हटविले असते तर मित्रपक्षांना भाजप वापरून फेकून देतो असा अत्यंत वाईट मेसेज गेला असता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ते परवडणारे नव्हते.
काही जुन्या आणि काही नवीन मित्रांना जोडायला निघालेल्या भाजपवर मग कोणी विश्वास ठेवला नसता. काकांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि भाजपसोबत यावे असे खूप प्रयत्न त्यांनी केले पण यश आले नाही.
मोठ्या साहेबांनी निक्षून नाही सांगितले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनाही भाजपसोबत आणण्याचा चमत्कार अजित पवार यांनी केला असता तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले असते, पण ते झाले नाही. एकप्रकारे काकांनी पुन्हा एकदा पुतण्याची मुख्यमंत्रिपदाची वाट रोखली असे म्हणावे लागेल.
अजित पवार आणि शंका
भाजपचे नेते, कार्यकर्ते, मतदार यांनी एकनाथ शिंदेंना स्वीकारले, कारण ते शिवसेनेचे होते; हिंदुत्व हा समान दुवा होताच, पण भाजपच्या नेतृत्वाने अजित पवार व त्यांच्या समर्थकांना स्वीकारले असले तरी भाजपचे कार्यकर्ते, मतदार यांनी अद्याप स्वीकारलेले नाही. त्यासाठी अजित पवार यांना खूप मेहनत करावी लागणार आहे.
केवळ स्व. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्याने विश्वास निर्माण होणार नाही. एकनाथ शिंदे उद्याही भाजपसोबतच राहतील हा भाजपजनांना विश्वास वाटतो, पण हयातभर भाजपचा दु:स्वास करणारे शरद पवार यांच्या मुशीतून तयार झालेले अजित पवार उद्या धोका देणार नाहीत याची हमी काय, अशी शंका त्यांच्या मनात आहेच. ती दूर करावी लागेल.
पहाटेचा शपथविधी सोडला तर शब्दाचे पक्के अशीच त्यांची प्रतिमा आहे. पहाटेचा शपथविधी करायला त्यांना कोणी भाग पाडले व मग कोण मागे फिरले हे आता सगळे समोर आले असल्याने मागे फिरण्याचा डाग त्यांच्यावर राहिलेला नाही. भाजपसोबत ते लवकर ॲडजस्ट होतील असे दिसते.
अजित पवार यांना भाजपसोबत पाठविण्याची खेळी शरद पवार यांची होती या समज-गैरसमजाबाबत स्पष्टता आणत ते काकांच्या खेळीचा भाग नाहीत हे कृतीने पटवून द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळवून देण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला तर त्यांची पुढची वाट प्रशस्त होईल. शरद पवार आता भाजपसोबत जाणार नाहीत हे स्पष्ट झालेले असताना अजित पवार यांनी त्यांच्याविरुद्ध जाहीर भूमिका घेतलीच पाहिजे, असे भाजपश्रेष्ठींना नक्कीच अपेक्षित असणार.
शिंदे-फडणवीस-अजितदादा यापैकी कोणाला कधी काय द्यायचे याचा आराखडा वर ठरलेला आहे, पण तिघांना त्यांच्या कर्तृत्वाने तो बदलवताही येऊ शकतो. जयंत पाटलांची उरभेट सुनील तटकरेंना फोटोजेनिक वाटली असेल, पण दिल्लीच्या कॅमेऱ्याने ती कशी टिपली असावी याला महत्त्व आहे. जयंत पाटलांचे जे नुकसान व्हायचे ते झालेच आहे; आपले नुकसान होऊ नये हे तटकरेंनी बघितले पाहिजे.
तरुणीला मिळवून दिला तातडीने न्याय
किरण कुर्मावार या काळीपिवळी टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गडचिरोलीच्या तरुणीची ब्रिटनमध्ये उच्चशिक्षणासाठी निवड झाली आहे. ती बुधवारी विधानभवनात आली होती. तिला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला तातडीने न्याय मिळवून दिला ते पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शिंदे यांच्यातील शिवसैनिक इर्शाळवाडीतही दिसला होताच.