हरणासारखा प्राणी आढळला, वनाधिकारी बोलावले तर सर्वांनाच बसला धक्का.
रायगड:रायगडमधून सध्या एक बातमी समोर आली आहे. माणगांवमध्ये गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे दिसून आले. याठिकाणी वनविभागाची टीम देखील बोलावण्यात आली.
परंतु हा परिसर खूप मोठा असल्याने या छोट्याशा प्राण्याचा शोध घेणे शक्य नव्हते.तरीसुद्धा स्थानिकांमध्ये जनजागृती करून हा प्राणी पुन्हा दिसल्यास जवळ न जाता त्वरित कळविण्याचे आवाहन करत वनरक्षक त्या ठिकाणाहून परतले.
असे असताना दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली. त्यानंतर तातडीने वन्यजीव अभ्यासक शंतनू आणि त्याचा सहकारी मित्र शुभांकर तेथे पोहोचले.
त्यांनी पाहणी केली असता हा प्राणी माउस डियर मराठीत मूषक हरीण किंवा पिसोरी म्हणून ओळखले जाणारे हरीण असल्याचे खात्रीपूर्वक कळले. यामुळे सर्वांना धक्का बसला.
हा एक दुर्मिळ प्राणी आहे. बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील प्रजापती यांच्या कपड्यांच्या दुकानात शिरले. तिथे शंतनु कुवेसकर यांनी प्रयत्नांनंतर त्या हरिणाला हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण १५ मिनिटे दुकानाच्या बंद खोलीत ठेवले.
पिसोरी हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत काळजी घेत या मादी पिसोरी हरिणास जवळच्याच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
अधिवासात सोडताना पिंजऱ्याचे दार उघडताच मोकळा श्वास घेत पिसोरी हरीण आपल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने निघून जातानाचे दृश्य काही वेगळेच समाधानकारक होते. हे एक अतिशय लाजाळू हरीण आहे.