आपत्तीग्रस्तांच्या मदतीत ‘दुपटी’ने वाढ; CM शिंदेंची मोठी घोषणा
अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे आपत्तीग्रस्तांना आता १० हजार रूपये आर्थिक मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२८ जुलै) विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी ५ हजार रूपये इतकी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात होती. त्यामध्ये वाढ करून आता १० हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे काही निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज मांडले.
विधानसभेतून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, असे मत पावसामुळे झालेल्या नुकसानीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार नाही- मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला
आम्ही वर्कफ्रॉम होम करत नाही, तर फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार नाही, असा टोला देखील मविआ सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोस असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Monsoon Session 2023 : दुकानदार आणि टपरीधारकांनाही मदत मिळणार
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही, त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन शासनाने त्यांनाही आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तसेच छोट्या-छोट्या टपऱ्यांमधून व्यवसाय करणारे आणि कुटुंब चालवणारे अनेक जण आहेत. अशा नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता अशा टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना ही मदत देण्यात येणार आहे.