‘ही’ खातरजमा केल्याविना घर खरेदी करू नका!, उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई: मुंबईत स्वतःचे घर असणे, हे प्रत्येक सामान्य नागरिकाचे स्वप्न असते. बँकांच कर्ज घेऊन काही जण घर घेण्याची हिंमत करतात, पण तिथे फसगत होते. याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. नुसत्या रेरा अप्रुव्ह जाहिरातीच्या जोरावर घर घेऊ नये. असं आवाहन फडणवीसांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाचा आज दि. २७ जुलै रोजी नववा दिवस आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण जेव्हा महारेरा तयार केला. तेव्हा आपण पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की 100 टक्के डिजिटल असेल. महारेराच्या सबमिशनपासून अप्रुव्हलपर्यंत सगळं डिजिटल आहे. कुठल्याही व्यक्तीला एखादं घर खरेदी करायचं असेल. तर ती स्किम महारेरा अप्रुव्ह आहे की नाही, हे महारेराच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल. महापालिकेचा डेटा आणि महारेरा डेटा एकमेकांशी मॅच होतो का? याची मला आता कल्पना नाही. पण त्याबाबत सूचना दिल्या जातील.” असं फडणवीस म्हणाले.
मुंबई आणि ठाणे परिसरात प्रचंड अनधिकृत बांधकामं झाली आहे. त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी काही उपाययोजना केली जाणार का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी केल्यावर फडणवीस म्हणाले, “आपण मोठ्या प्रमाणात सॅटेलाईट इमेजरीचा वापर करू शकतो. मुंबई, ठाणे आणि पुणे या सारख्या आर्थिक स्थिती चांगल्या असलेल्या महापालिकांनी सॅटेलाईट इमेजरीचा वापर करावा. दर महिन्याला त्यांनी सॅटेलाईट इमेजरी घेतली तर अनधिकृत बांधकामावर नियंत्रण करता येईल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. आज आपल्याला सर्रास सर्व ठिकाणी रेरा अप्रुव्ह असे बोर्ड दिसतात. पण खरंच त्याला मान्यता मिळाली आहे की नाही? हे बघितलं पाहीजे. त्यामुळे माझी सामान्य जनतेला विनंती आहे की, रेरा अप्रुव्ह लिहिलं असलं तरीही रेराच्या वेबसाईटवर जाऊन तपासावं. ही वेबसाईट अगदी सोपी आहे. त्यामुळे नुसत्या रेरा अप्रुव्ह जाहिरातीच्या जोरावर घर घेऊ नये.’ असं फडणवीस म्हणाले.