संततधारेमुळे ‘पानशेत’ची शंभरीकडे वाटचाल
खडकवासला: सिंहगडसह खडकवासला भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी रायगड जिल्ह्यालगतच्या धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पानशेत (तानाजी सागर) धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
बुधवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता पानशेत धरणात 71.49 टक्के साठा झाला आहे. याच वेळी खडकवासला धरणसाखळीत 19.48 टीएमसी म्हणजे 66.85 टक्के साठा झाला होता.
मंगळवारी सायंकाळी खडकवासलातून मुठा कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पाण्याची आवक कमी झाल्याने बुधवारी दुपारी नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला. शंभर टक्के साठा झाल्यावर खडकवासलातून जादा पाणी नदीत सोडले जाणार आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले.
दहा दिवसांत 11 टीएमसी
पानशेत मुठा खोर्यातील संततधार पावसामुळे दहा दिवसांत धरण साखळीत 11 टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाले. 15 जुलैला धरण साखळीत 8.50 टीएमसी पाणी होते. गेल्या वर्षी 26 जुलैला धरण साखळीत 21.15 टीएमसी म्हणजेच 72.57 टक्के पाणी होते. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 25 मि. मी., वरसगाव येथे 5, पानशेत येथे 5 आणि खडकवासला येथे 1 मि. मी. पाऊस पडला.
धरणसाखळीतील साठा टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर 1.77 (47.76), वरसगाव 8.24 (64.31) , पानशेत 7.61 (71.49) खडकवासला 1.86 ( 94.08)