कोतवाल भरती प्रक्रिया पुन्हा रखडली
तालुक्यातील कोतवाल भरतीचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. सन 2017 पासूनच या भरती प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. यावर्षी कोतवाल भरतीचा मुहूर्त निघाला.
22 जुलैला परीक्षेची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कामाचे निमित्त आल्याने ही परीक्षा आता 30 जुलैला होणार आहे. तालुक्यात 20 ऑगस्ट 2017 रोजी 13 कोतवालपदाची परीक्षा निश्चित झाली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षेसाठी 257 लोकांचे कोतवाल बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. नंतर ही परीक्षा 10 सप्टेंबर 2017 ला घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. मात्र तालुक्यात 40 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने कोतवाल भरतीची प्रक्रियाच रद्द करण्यात आली आणि 13 उमेदवारांचा रोजी रोटीचा प्रश्न हिरावण्यात आला होता.
आता तब्बल 6 वर्षांनी पुन्हा कोतवाल भरतीचा मुहूर्त निघाला. तालुक्यात 21 कोतवालाची पदे रिक्त आहेत. 21 जागा नियमानुसार आरक्षित करण्यात सुद्धा आल्या होत्या. मात्र राज्य शासनाचे 80 टक्के कोतवाल पद भरतीला मान्यता दिल्याने 17 जागा भरण्यात येतील. यासाठी गावाची निवड चिठ्या टाकून करण्यात आली. त्यामध्ये चार साज्यातील कोतवाल पदाच्या जागाची भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. 17 कोतवाल पदासाठी परीक्षा 22 जुलैला घेण्यात येणार होती. 17 जागांसाठी 362 उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले होते. मात्र ऐनवेळी प्रशासकीय कारण सांगून ही परीक्षाच रद्द करून आता 22 जुलै ऐवजी 30 जुलैला कोतवाल पदाची परीक्षा होणार आहे. कोतवाल पदाची परीक्षा 22 जुलै रोजी होणार होती. मात्र या भरती प्रक्रियेचे अध्यक्ष (उपविभागीय अधिकारी) यांची पुणे येथे यशोदामध्ये ट्रेनिंग लागल्याने ही परीक्षा रद्द करण्यात येऊन आता अर्जुनी मोरगाव उपविभागातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील कोतवाल पदाची परीक्षा 30 जुलै रोजी होणार आहे. प्रशासकीय कामकाजामुळेच परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.