राज्यात पुढच्या ३-४ तासांत तुफान पाऊस, मुंबईसह ४ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा…
राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई नजिकच्या भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. चालू आठवड्यातही पाऊस कायम राहणार असून पुढचे काही तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत.
कारण, हवामान खात्याकडून ४ भागांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या मुंबई वेधेशाळेकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढच्या ३-४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस होऊ शकतो.
तर घाट माथ्यावर पावसाचा जोर आणखी तीव्र असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर पाहायला मिळेल. तर नवी मुंबईतही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
दरम्यान, आज, मंगळवारी मुंबईस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरातही पावसाचा जोर या आठवड्यात कायम राहील अशी शक्यता आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली येथे बुधवारपर्यंत एकदोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तर नांदेड, लातूर या या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत एकदोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भंडाऱ्यामध्ये गुरुवारी, चंद्रपूरमध्ये बुधवार आणि गुरुवारी, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये बुधवारी, गोंदियामध्ये गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, घाट माथ्यावरही पावसाचा जोर
मुंबई परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आज, मंगळवारी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यामध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सोमवारच्या अद्ययावत इशाऱ्यानुसार ठाणे जिल्ह्याला बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे.
अशात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. कोकणासोबत घाटमाथ्यावरही पावसाचा जोर गुरुवारपर्यंत कायम असू शकतो. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाट परिसरात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पुणे आणि सातारा परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे अतितीव्र मुसळधार (२०४ मिलीमीटरहून अधिक) पाऊस पडू शकतो.