माझी भाकरी…शिकविणार्या गुरुजींच्या बदलीने अश्रू अनावर
जत: कुलाळवाडी येथील एका शिक्षकाच्या बदलीनंतर शिक्षक आणि समाजाचे नाते किती ममत्वाचे असू शकते हे दिसून आले. गावातील अबालवृद्धांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू होत्या.
विद्यार्थी ढसाढसा रडत होते. बदली झालेले शिक्षक त्यांना कडेवर घेऊन समजूत काढत होते. महिला औक्षण करत होत्या. विद्यार्थी पाया पडत होते. हा प्रसंग ज्यांच्या बदलीच्या निरोपाप्रसंगी घडला आहे, त्या शिक्षकाचे नाव आहे भक्तराज मनसुख गर्जे.
गर्जे यांचे मूळ गावी पैठण आहे. त्यांची बदली जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या तालुक्यात वालठण जि.प. शाळेत झाली आहे. बदलीनंतर निरोप समारंभप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, हजारो गावकरी यांच्या उपस्थितीत निरोप दिला. विद्यार्थ्यांकडून शिक्षकाच्या पायाला स्पर्श करण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती संपण्याचं नावच घेत नव्हती. यावेळी सहकारी शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेच, शिवाय विद्यार्थीही रडले. रविवारी सकाळी सुरू झालेला निरोपाचा सोहळा संध्याकाळी मिरवणूक काढेपर्यंत सुरूच होता. 12 वर्षांपूर्वी रुजू झाल्यानंतर गर्जे यांनी सुरुवातीस पाण्याची पातळी खालावल्याने शेतकर्यांचे ऊस तोडीसह इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागत होते. या बाबीचा विचार करून 2017 व 2018 या वर्षात पाणी फाऊंडेशनसारखे उपक्रम राबवले.
‘माझी भाकरी’ उपक्रमाची शासनाकडून दखल
कुटुंबांना ऊसतोडी व मजुरीसाठी स्थलांतरित व्हावे लागत होते. विद्यार्थी शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहत होते. याचा गर्जे यांनी सर्वे केला. त्यावेळी अनेक पालकांनी सांगितले की, त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही. म्हणून त्यांनी भाकरी शिकवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले व सलग चार वर्षे भाकरी भाजण्याच्या स्पर्धा शाळेत घेतल्या. त्यांना खिशातून बक्षीस दिले गेले. मुलेही भाकरी करू लागली. यामुळे स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा भाकरीचा प्रश्न मिटला आणि कुटुंबाची ही चिंताही मिटली. ‘माझी भाकरी’ या उपक्रमाची महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी दखल घेतली.