सरसंघचालकांसह मान्यवरांनी घेतले देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
मदन दास देवी यांचे सोमवारी 24 जुलै रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. मदन दास देवी यांचे नातेवाईक पुण्यात असून, निवृत्तीनंतर देवी यांचे वास्तव्य पुण्यातच होते. आजारपणामुळे निसर्गोपचारासाठी त्यांना बेंगळुरू येथे हलविण्यात आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मोतीबाग येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मदन दास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेची संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्चशिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1959 मध्ये प्रवेश घेतला. एम.कॉम. नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवून ते सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाले. पुण्यात शिक्षण घेत असतानाच मोठे बंधू खुशाल दास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. देवी यांनी सुमारे 70 वर्षे संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सहसरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. कैलासवासी मदनदास देवी यांच्या पार्थिवावर सकाळी 11.30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेत.