दिवसा घरफोडी करणारी स्वामी टोळी जेरबंद
पुणे: पुणे शहरात दिवसा घरफोडी करणार्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका सराफाचा देखील समावेश असून, त्यांच्या ताब्यातून 7 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकूण आठ घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. पंचाक्षरी संगय्या स्वामी (वय.35), नरेश विष्णू अच्चुगटला (वय.33), अंगद वाल्मिक मंडगर (वय.30), शावरसिद्ध भरत पुजारी (वय.35), कल्याणप्पा मलप्पा इंडी (वय.49,राहणार सर्व सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही टोळी शहरात दिवसा बंद असलेली घरे शोधून घरफोड्या करत होती. नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या नागरिकांच्या घराची रेकी करून डल्ला मारण्यात ही टोळी तरबेज आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील या टोळीने अनेक ठिकाणी घोरपडे केले आहेत.
विश्रांतवाडी परिसरातील घरफोडीच्या गुह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषन आणि बातमीदारामार्फत पोलिस कर्मचारी संपत भोसले व प्रफुल्ल मोरे यांना माहिती मिळाली होती की, मुंजाबावस्ती येथे तीन व्यक्ती संशयितरीत्या थांबले असून, ते घरफोडीच्या तयारी आहेत. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी दोन पथके तयार करून तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला.
वेळीच प्रसंगावधान राखत तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिघांनी विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यातून कटावणी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त श्रीकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते, पोलिस हवालदार दिपक चव्हाण, यशंवत कर्वे, कर्मचारी संपत भोसले, प्रफुल्ल मोरे, संदिप देवकाते, शेखर खराडे यांच्या पथकाने केली.