लोकसभेच्या १०५ जागांवर भाजपचा पराभव करणे विरोधकांना कठीण, पाहा आकडेवारी काय सांगते?
आगामी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) गेल्या मंगळवारी दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले होते. तर दुसरीककडे २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही त्याच दिवशी बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे, यावर विचारमंथन केले.
या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस’ (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभानिवडणूक ‘एनडीए’ विरोधात ‘इंडिया’ अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या सगळ्यामध्ये मागील २०१९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमधील आकडेवारीवर एक नजर टाकली असता, यावरून विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’साठी ही आकडेवारी मोठे आव्हान म्हणता येईल.
मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे आकडे कितपत प्रभावी ठरतील, यावर काहीही सांगणे आता तरी घाईचे ठरेल. परंतू या आकडेवारीवरून भाजपची ताकद किती आहे, याचा अंदाज लावता येईल. द प्रिंटमधील वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजपने तीन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने १०५ जागा जिंकल्या होत्या. भाजपचा हा विजय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याच मतांच्या फरकाने मिळविलेल्या जागांपेक्षा ६३ जास्त होता.
दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या २३६ खासदारांपैकी १६४ फक्त भाजपचे होते
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या २३६ खासदारांपैकी १६४ फक्त भाजपचे होते. दुसरीकडे, तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या १३१ खासदारांपैकी १०५ भाजपचे होते. उर्वरित २६ खासदारांपैकी १० द्रमुकचे आणि पाच काँग्रेसचे होते. भाजपच्या उमेदवारांनी ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ४४ जागा जिंकल्या होत्या. एवढेच नाही तर पक्षाचे १५ खासदार होते, जे ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
भाजपकडून मिळणार कडवे आव्हान?
लोकशाहीत विजय-पराजयावर कोणाचेही नियंत्रण नसते, पण ही आकडेवारी पाहता या जागांवर भाजपला टक्कर देणे विरोधी आघाडी ‘इंडिया’साठी सोपे जाणार नाही, असे सहज म्हणता येईल. या सर्व जागांवर विरोधकांना आगामी निवडणुकीत भाजपकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या या १०५ जागांवर भाजपला पराभूत करणे विरोधकांना अशक्यप्राय वाटते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.