चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीची केली हत्या,सासूची देखील गोळ्या झाडून हत्या
मुंबई : उरण पोलिसांनी बेवारस महिलेच्या हत्येच्या तपासात दुहेरी हत्येचा गुन्हा उघड करून तिघांना अटक केली आहे. सराईत गुन्हेगाराने पत्नीची हत्या केल्यानंतर सासूला भेटीसाठी बोलावून तिची देखील गोळ्या झाडून हत्या केली होती.
सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये उरणच्या सारडे गावात बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या डोक्यात गोळ्या झाडून तसेच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मात्र तिची ओळख पटेल असे काहीच पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यानुसार या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त धनाजी क्षीरसागर, गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम, निरीक्षक सूर्यकांत कांबळे, विजय पवार आदींचे पथक तपास करत होते. त्यामध्ये सदर महिला डोंबिवली परिसरातली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून डोंबिवली परिसरात पोलिसांनी तिच्याबद्दल चौकशी केली असता ती जावयाला भेटण्यासाठी अलिबागला गेली असता परत आली नसल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी तिच्या जावयाबद्दल माहिती मिळवली असता मयुरेश गंभीर या सराईत गुन्हेगारांची माहिती समोर आली. मयुरेशसोबत त्या महिलेच्या मुलीचे दुसरे लग्न झाले असून मयुरेशला तडीपार करण्यात आले होते. त्याद्वारे पोलिसांनी त्याच्या ठिकाणाची माहिती मिळवून मानपाडा येथून त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने दुसरी पत्नी व सासू यांची हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीला फिरण्यासाठी नागाव बीचवर घेऊन आल्यानंतर साथीदारांसोबत तिची हत्या करून मृतदेह फेकला होता. त्यानंतर मुलीला भेटीसाठी बोलावून साई गावच्या खिंडीत त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करून गळ्यावर वार करून मृतदेह समुद्रात फेकून दिला होता. चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नी प्रिया हिची हत्या केली होती. तर सासू सतत पैसे मागत असल्याने तिलाही मुलीला भेटीसाठी बोलावून तिचीही त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. याप्रकरणी मयुरेश गंभीर याच्यासह दिलीप गुंजलेकर, बाबू निशाद व अबरार शेख यांना अटक केली आहे. मयुरेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन हत्या तसेच इतर गुन्हे असून त्याला एकदा मोक्का देखील लावलेला आहे.