पंतप्रधान मोदींनी केली सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस
नवी दिल्ली :सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार्टर्ड फ्लाइटचे भोपाळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग झाल्याच्या घटनेनंतर आज पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सोनियांनी पंतप्रधानांना सांगितले.
गुरुवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सकाळी 11 वाजता, लोकसभेचे कामकाज सुरू होण्याच्या 2 मिनिटे आधी सभागृहात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी बाकांकडे गेले आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते लोकसभेत दाखल होताच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार घोषणाबाजी करत आणि उभे राहून स्वागत केले.
यानंतर पंतप्रधान विरोधी बाकांकडे गेले. विरोधी पक्षाच्या खासदारांना अभिवादन करून आणि त्यांचे अभिवादन स्वीकारताना, पंतप्रधान मोदी आधी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंह यांच्याजवळ थांबले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि बोलले.
त्यानंतर ते सोनिया गांधींच्या बाकाकडे गेले आणि त्यांना अभिवादन केले. सोनिया गांधी यांनीही उभे राहून पंतप्रधानांना नमस्कार केला. पंतप्रधानांनी काही काळ थांबून सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर पंतप्रधान लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या बाकासमोर पोहोचले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार करत अभिवादन केले.
मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूहून दिल्लीला जात असताना सोनिया-राहुल यांच्या चार्टर्ड विमानात ऑक्सिजनची कमतरता होती. भोपाळ विमानतळावर सुमारे दीड तास थांबल्यानंतर दोघेही रात्री 9.35 वाजता इंडिगोच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले होते.