चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग ‘गायब’ जगभरात खळबळ
बीजिंग : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग हे महिन्याभरापासून ‘गायब’ असल्याचे गूढ वाढत चालले आहे. खुद्द चीनमध्ये गँगच्या रहस्यमयरीत्या गायब होण्याची जोरदार चर्चा आहे.
गँग यांनी २५ जून रोजी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांच्यासोबत चर्चा केली होती.
त्यानंतर ते दिसलेच नाहीत. त्यावर चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री गँग यांची तब्येत खराब आहे. तरीही राजनैतिक बाबींत कोणतीही अडचण नाही. सर्व गोष्टी योग्यरीतीने सुरू आहेत. तरीही परराष्ट्र मंत्री दिसत नसल्याची चर्चा चीनमध्ये जोरदार होत आहे.
अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन व अमेरिकेचे नेते जॉन केरी यांच्या चीनच्या दौऱ्यातही गँग दिसले नाहीत, तर इंडोनेशियात गेल्या आठवड्यात झालेल्या ‘आसियान’ देशांच्या बैठकीत ते दिसले नाहीत.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, गँग यांची प्रकृती ठिक नाही. ते बैठकीतही सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांच्या जागी माजी परराष्ट्र मंत्री वांग यांनी बैठकीत सहभाग घेतला आहे.
याचवेळी गँग यांचे एका टीव्ही अँकरसोबत अफेअर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच वरिष्ठांच्या नाराजीचा संबंध त्यांच्या गायब होण्याशी लावला जात आहे.
गँग हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्यावर्षीच त्यांना परराष्ट्र मंत्रिपद मिळाले होते. गँग यांनी अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणूनही काम केले आहे.