भारतीय शूटरच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज
मुंबई: मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये आज पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला. मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.
या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले मेसेजमध्ये?
या धमकीच्या मेसेजमध्ये मुंबईमध्ये हल्ला करण्यासोबतच योगी आणि मोदी यांनाही लक्ष्य करणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात 12 जुलैला हा मेसेज आला होता. हा मेसेज सायंकाळी साडेचारच्या सुमारास आला असून तो आखाती देशातून आल्याचं म्हटले जात आहे.
या मेसेज प्रकरणामागे मध्य प्रदेशातील एक तरुण असल्याचा संशय आहे. तो कामानिमित्त सध्या आखाती देशात आहे. हा मेसेज तोच पाठवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तो आखाती देशात असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण जात आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत असून पोलीस या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.