येशूच्या भेटीचं स्वप्न दाखवत केनियात ४०० हून अधिक लोकांचा बळी; आणखी १२ मृतदेह सापडले
नेरोबी :केनियामध्ये ख्रिश्चन पंथाच्या अनुयायांचे मृतदेह सापडण्याची मालिका थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी’ उपाशी राहणाऱ्या केनियन पंथातील मृतांची संख्या आता ४०० च्या पुढे गेली असून सोमवारी आणखी १२ मृतदेह सापडले आहेत असं केनियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले
शाकाहोला जंगलात उत्खननाच्या नव्या तपासात हा आकडा ४०३ वर पोहोचला आहे. पंथाचा नेता पॉल न्थेंज मॅकेन्झीने कथितपणे अनुयायांना येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी उपाशी राहण्याचं आवाहन केलं होतं.
एएफपी या वृत्तसंस्थेतील रोडा ओन्यांचा यांनी सांगितले की, ‘उत्खनन आणि शोधाचे काम उद्याही सुरू राहणार आहे. कारण तपास करणारे पथक जंगलात आणखी थडगे शोधत आहेत. याआधी काही मृत, इतर जिवंत परंतु कमकुवत लोकांना १३ एप्रिलला शोधले होते. फादरने येशूला भेटण्यासाठी उपाशी राहण्याचं आवाहन केल्यानंतर अनुयायींना कित्येक दिवस काहीच खाल्ले नव्हते. आतापर्यंत यात ४०३ जणांचा मृतदेह सापडला आहे. जंगलात थडगे आणि मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत एक महिन्याची वाढ केली
सरकारी शवविच्छेदनानुसार, उपासमार हे मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे दिसते. पण, लहान मुलांसह काही जणांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर या प्रकरणातील मुख्य आरोपी एप्रिलपासून पोलिस कोठडीत आहेत. ३ जुलै रोजी न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत एक महिन्याची प्रलंबित चौकशीसाठी वाढ केली आहे.
प्रभूला भेटवण्याचं वचन
पादरी आणि पंथ नेते पॉल मॅकेन्झी यांच्या मालकीच्या जमिनीवर कबरे खोदली जात होती. केनियाच्या एनटीव्ही वाहिनीने मॅकेन्झीने अटक झाल्यानंतर तुरुंगात उपोषण सुरू केल्याचे वृत्त दिले होते. पोलिसांनी सांगितले होते की, बचावलेल्या १५ उपासकांना उपाशी राहण्यास सांगितले होते जेणेकरून ते त्यांच्या निर्मात्याला म्हणजेच देवाला भेटू शकतील. त्यापैकी चौघांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
पादरीवर दहशतवादापासून नरसंहाराचा आरोप
स्वयंघोषित धार्मिक नेता पॉल नथेंग मॅकेन्झी दहशतवाद, नरसंहाराशी संबंधित आरोपांना सामोरे जात आहे, असे राज्य सरकारी वकिलांनी म्हटले आहे, परंतु अद्याप आरोपीने याचिका दाखल केलेली नाही. पादरीने २००३ मध्ये गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चची स्थापना केली होती. सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे ५० मिलियन लोकसंख्या असलेल्या पूर्व आफ्रिकन देशात ४,००० हून अधिक चर्च नोंदणीकृत आहेत.