सुरक्षा दलाकडून मोठी कामगिरी! चार दहशतवाद्यांचा खात्मा
पूछ जिल्ह्यातील सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी केली आहे. सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई करून चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. अद्याप, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नसल्याचे सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.श्रीनगर- सुरक्षा दलाकडून सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम राबविली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार केले.
सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर पहिली चकमक सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास झाली. त्यानंतर सुरक्षा दलाने रात्रीच्या इतर पाळत ठेवणाऱ्या उपकरणांसह ड्रोन तैनात करण्यात आले. पूंछमधील सिंध्रा भागात भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस आणि इतर सैन्यदलांची संयुक्त कारवाई करण्यात आली. आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार होऊन पुन्हा चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी बहुधा विदेशी आहेत. त्यांची ओळख पटविली जात आहे.
सुरक्षा दलाकडून सतत कारवाया सुरू- यापूर्वी 27 जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हावडा गावात चकमक झाली होती. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर एक पोलीसही जखमी झाला. कुपवाडा जिल्ह्यात 16 जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली होती. यावेळी पाच विदेशी दहशतवादी ठार झाले. त्यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षित स्थळी नेले होते. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली होती.
सुरक्षा दलाच्या मोहिमेत वाढ- पाकिस्तानमधून पाठविण्यात आलेले दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोर करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नेहमीच सुरक्षा दलाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येते. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलाकडून सातत्याने मोहिम राबविले जाते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकडे सुरक्षा दलाच्या मोहिमा वाढल्या आहेत.
ड्रोनमधून अमली पदार्थांची तस्करी- पाकिस्तानमधून भारतामध्ये अमली पदार्थ पाठविण्यासाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. असे ड्रोन पाडण्यासाठी सुरक्षा दलाकडून कारवाई करण्यात येते. पंजाब सीमेनजीक असे ड्रोन आढळल्यानंतर सुरक्षा दलाने यापूर्वी कारवाई केली आहे. ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संरक्षण साधने पुरविण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला आहे. हे ड्रोनदेखील सुरक्षा दलाने पाडले आहेत.