ताज्या बातम्या

अशी काळजी घेणार नसाल तर, तणनाशके अजिबात वापरू नका


सध्या परिस्थितीत चांगला पाऊस जरी झालेला नसला तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत. पेरणी आधी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण शक्ती घरचे घरी तपासूनच आपले बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की नाही हे ठरूनच पेरणी केली असेल. कारण कोणतेही बियाणे जमिनीत पेरणीच्या आधी उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे असते, त्यामुळे बियाण्याचा पेरणीचा दर निश्चित करता येतो. जेणेकरून एकरी झाडांची संख्या शिफारशी प्रमाणे ठेवता येईल.

पेरणी आधी बियाण्याला बियाण्यापासून, जमिनीपासून व हवेद्वारे होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक व जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे असते, त्यामुळे पीक संरक्षण खर्चात बचत होऊन पिकाची जोमदार वाढ होऊन पीक सशक्त बनते तसेच जैविक खतांचे बीज प्रक्रियेमुळे रासायनिक खतांमध्ये बचत सुद्धा होते.

ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही बाकी असतील त्यांनी पेरणी आगोदर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. शेती व्यवसायामध्ये ज्या निविष्ठांवर जास्त खर्च करावा लागतो ती म्हणजे रासायनिक खते, रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीत लक्षात घेता रासायनिक खतांचा वापर ही कार्यक्षमपणे समजून उमजून करणे गरजेचे आहे, बरेचसे शेतकरी रासायनिक खतांचा शिफारशी प्रमाणे वापर करीत नाही जर रासायनिक खतांचा असंतुलित आणि अवाजवी वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम जमिनीच्या आरोग्यावर, पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर दिसून येत आहेत, त्यासाठी पिकांच्या अन्नद्रव्याच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांचे शिफारशीनुसार व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावे. नुसते रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत व हिरवळीचे खतांचा वापर करावा.

रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही खते उघड्यावर न टाकता उकरुन द्यावे, सध्या परिस्थितीत शेतांमध्ये तणांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शेतकऱ्यांना निंदणी करण्यासाठी मजूर वेळेवर मिळत नाही व मजुरी खर्च सुद्धा जास्त येतो, म्हणून शेतकरी तण नियंत्रणासाठी तननाशकाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहेत, बऱ्याच ठिकाणी चुकीचे तननाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहेत तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.

तणनाशके वापरण्याच्या पद्धती

१) तण उगवण्यापूर्वी वापरायचे तणनाशक: ही तणनाशके पिकांची लागवड झाल्यापासून दोन ते तीन दिवसात पीक व तन उगवण्याच्या आधी वापरावी लागतात. याचा वापर करताना ज्या पिकांसाठी ज्या तणनाशकाची शिफारस केलेली आहे त्यासाठी त्याचाच वापर करावा.

२) उगवणीनंतर वापरावयाची तणनाशके : ही तणनाशके उभ्या पिकांमध्ये तन उगवून आल्यानंतर तणे तीन ते पाच पानावर असताना वापरायची असतात तण प्रमाणापेक्षा मोठे झाल्यानंतर तनांचे प्रभावी नियंत्रण होत नाही.

महत्वाचे:

तणनाशकाची कार्यपद्धती विक्रेत्यांकडून समजावून ज्या पिकांसाठी लेबल क्लेम दिलेला असेल त्या पिकांमध्येच वापर करावा अन्यथा पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
तणनाशकाची मात्रा शिफारस केल्याप्रमाणेच घ्यावी कमी प्रमाणात वापरल्यास तणांचा नाश होत नाही, शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा अधिक प्रमाणात वापरल्यास पिकांना इजा होण्याची शक्यता असते.
शिफारस केलेल्या पद्धतीनेच तणनाशकांचा वापर करावा.
तणनाशकांची फवारणी वारा शांत असताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
तणनाशकांची फवारणी साठी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे
तण उगवणीपूर्वी फवारणीसाठी प्रति एकरी ३०० ते ३५० लिटर पाण्याचा वापर करावा तर उभ्या पिकात तननाशकाची फवारणीसाठी प्रति एकरी २०० ते २५० लिटर पाणी वापरावे
फवारणी करताना विनाकारण पिकांवर फवारणी करू नये तणावरच फवारणी करावी.
फवारणीसाठी स्वच्छ व क्षारांचे प्रमाण कमी असणारे पाणी वापरावे गढूळ पाणी वापरू नये.
फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा.
कीटकनाशके फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या नोझलचा वापर करू नये.
तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप असावा पंप एकच असल्यास फवारणीनंतर दोन ते तीन वेळा कपडे धुण्याची पावडर टाकून धुवून घ्यावा.
फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनांचा जसे टोपी, गॉगल, मास्क, मौजे इत्यादींचा वापर करावा.
शेतकरी बंधूंनी तणनाशक निवडताना ते कोणत्या पिकांसाठी शिफारस केलेले आहे हे काळजीपूर्वक तपासावे कोणतीही तणनाशक शंभर टक्के कायमस्वरूपी तणांचा बंदोबस्त करीत नाही वरील सर्व बाबींचा विचार करून आपले पीक नियोजन करावे जेणे करून आपले उत्पादन खर्चात बचत होवून उत्पन्नात वाढ होइल.

-संजय म.उमाळे शास्त्रज्ञ (कृषिविद्या)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button