श्री विष्णूंना प्रिय आहे अधिक महिना; उद्यापासून होणार सुरु
हिदू पंचागानुसार, 18 जुलैपासून अधिक महिना सुरु होणार आहे. या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. शास्त्रानुसार, ज्या महिन्यात संक्रांत येत नाही त्या महिन्याला अधिक मास म्हटलं जातं.
दर तीन वर्षातून एकदा, अधिक महिना येतो. यंदा जवळपास 19 वर्षानंतर अधिक महिना श्रावणामध्ये येत आहे. त्यामुळे यंदा श्रावण महिना 2 महिन्याचा असणार आहे.
असा तयार होतो अधिक महिना
हिंदू पंचांग सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक महिना हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे. जो 32 महिने, 16 दिवस 8 तासांच्या फरकाने तयार होतो. पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य 12 राशींमधून प्रवास करत कालचक्राचे 1 वर्ष पूर्ण करतो. त्यात 365 दिवस 5 तास, 48 मिनीटे आणि 47 सेकंद असतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे 12 महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वी भोवती फिरण्यावर आधारीत असलेले 12 हिंदू चंद्रमास 354 दिवसात म्हणजेच 11 दिवस आधीच पूर्ण होतात.
सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची योजना करण्यात आली. तीन वर्षांत होणारा 33 दिवसांचा फरक अधिकमास टाकून ही कालगणणा सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
अधिक महिना श्री विष्णूंना प्रिय
अधिक महिना श्री विष्णूंना प्रिय असल्याने या काळात त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांच्या मंत्राचा जप करु शकता.
अधिक महिन्यात घरामध्ये श्रीमद्भागवत पाठ, सत्यनारायण कथेचे वाचन आणि श्रवण, श्रीविष्णु सहस्त्रनाम, श्री राम रक्षास्तोत्र, पुरुष सूक्ताचे पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
या व्यतिरिक्त तुम्ही ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो नारायणाय यांसारख्या श्री विष्णूंच्या मंत्राचा दररोज जप करु शकता.
तसेच यंदाचा अधिक महिना श्रावणात आल्याने तुम्ही श्री विष्णूंसोबत महादेवांची देखील पूजा-आराधना करु शकता.
अधिक महिन्यात करा ‘या’ गोष्टींचे दान
अधिक महिन्यात दान-धर्म केल्याने व्यक्तीला त्याच्या पापांपासून मुक्ति मिळते आणि देवाच्या आर्शिवादाने सुख-समृद्धी प्राप्त होते. या काळात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या काळात गरीब- गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. तसेच पिवळ्या वस्तूंचे दान करावे. ज्यामध्ये चणे, गूळ, तूप, पिवळे वस्त्र यांचा समावेश असेल.