संत ज्ञानेश्वर मंदिराची पायाभरणी ; भगवानगडावर होणार जगातील सर्वांत मोठे मंदिर
खरवंडी कासार (नगर ) : श्रीक्षेत्र भगवानगडावर विश्वमाऊली संत ज्ञानेश्वरांच्या संकल्पित मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या सूचनेनुसार शनिवारी ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते झाला.
यावेळी पायाभरणीबरोबर लागणार्या यंत्रसामुग्रीचेही पूजन करण्यात आले. श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थापक महंत संत भगवानबाबा यांची माऊली ज्ञानेश्वरावर नितांत श्रध्दा होती.
त्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळेबरोबर ज्ञानोबारायांची सोन्याची समाधीकंठा कायम स्वरूपी असायची. ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांचा तर प्राणच होता. गडावर ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर असावे, अशी त्यांची संकल्पना महंत नामदेव शास्त्री यांनी प्रत्यक्षात उतरविली. गडाच्या वैभवाला साजेशे भव्य मंदिर उभारणीसाठी महंतांनी आवाहन करताच अनेक गावे लाखो रूपयांची देणगी देण्यासाठी सरसावले. आता मंदिराची पायाभरणी झाली असून, 2026 पर्यंत दगडी मंदिर काम पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
गडावर असलेले अधिष्ठान!
विजयी विठ्ठल मूर्ती, संत भगवान बाबांची समाधी, द्वितीय उत्तराधिकारी महंत भीमसिंह बाबांची समाधी, जनार्धन स्वामी समाधी मंदिर, पांडवांचे गुरू धौम्य ऋषी मंदिर, हनुमान मंदिर, बाबांचे भक्त बाबुलाला यांची समाधी असून, आता भगवान गडाला सोन्याचा गड असा नवा आयाम देणारे ज्ञानेश्वर मंदिर लवकरच उभारले जात आहे.