शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत, आजचा बंगळुरू दौरा रद्द केल्याने चर्चांना उधाण
बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे नेते मोदी सरकारविरोधात बैठका घेत आहे. पाटणा येथील बैठकीनंतर आता कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बैठक बोलावली आहे.
या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत देशभरातील २४ पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. मात्र अचानक शरद पवार यांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. विरोधकांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या या बैठकीचा मिनिट टू मिनिट अजेंडा निश्चित करण्यात आला आहे. विरोधी पक्षांना दिशा मिळावी यासाठी बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत. आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खास डिनरही देण्यात येणार आहे. मात्र ते आज उपस्थित राहणार नाहीत, तर उद्या १८ जुलै रोजी बैठकीत सहभागी होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
याशिवाय आज होणाऱ्या बंगळुरू येथे येथील बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गुडघ्याची मायक्रोसर्जरी झाल्याने त्याही उपस्थित राहणार नाही. मात्र उद्या त्या बैठकीला येणार आहेत. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षातच फूट पडल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने येणार आहे.